श्री विठोबाची आरती
Read श्री विठोबाची आरती in its original Devanagari text, with source attribution, copy, download and print options.
युगे अठ्ठावीस, विटेवरीं उभा । वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटि, परब्रह्म आहे गा । चरणी वाहे भीमा, उध्दारी जगा ॥१॥
जय देव जय देव, जय श्री पांडुरंगा (हो हरी पांडुरंगा )। रखुमाईवल्लभा, राहींच्या वल्लभा, पावें जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळां, कर ठेवूनि कटीं । कांसे पीतांबर, कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर, नित्य येतीं भेटी । गरुड हनुमंत, पुढे उभे राहती ॥ जय० ॥२॥
धन्य वेणूनाद, अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे, वनमाळा गळां ।
राहे रखुंमाई, राणीया सकळा । ओवाळिती राजा, विठोबा सावळा ॥ जय० ॥३॥
ओवाळूं आरत्या, कुरवंट्या येती । चंद्रभागेमाजी, सोडुनिंया देती ।
दिंड्या पताका, वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा, वर्णावा किती ॥ जय० ॥४॥
आषाढी कार्तिकी, भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये, स्नानें जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती । केशवासी नामदेव, भावें ओवाळिती ॥ जय देव जय देव जय० ॥५॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये । निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला । गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥
आरती — mr.wikibooks.org contributors
Adaptation: the source HTML was converted to plain text and line breaks were normalised. An Aarti extracted from a collection omits draft editing prompts and reference-number markers. Attribution and the same licence accompany text downloads. Original-script text is supplied; an English translation has not been added.
Texts can have traditional variants. Specialist text and language review remains pending. Statements within a hymn reflect its devotional tradition and are not a guarantee of health, wealth or another outcome.